औरंगाबाद – मराठा समाजासाठी एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गातून १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक गुरुवारी विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर झाले. याचे ओबीसी संघर्ष समितीने स्वागत केले आहे. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी सरकारने घेतली असल्याचे आम्ही स्वागत करतो असे, ओबीसी संघर्ष समितीची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामभाऊ पेरकर म्हणाले.
ओबीसी समाजाच्या २७ टक्क्यांमधून मराठा
समाजाला आरक्षण दिली जाण्याची भीती ओबीसी नेत्यांना सतावत होती. यासाठी आज सकाळी
मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसी संघर्ष समन्वय समितीने आक्रोश आंदोलनही केले. मराठा
समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला धक्का लागला तर तीव्र आंदोलन केले जाईल असा
इशार या आंदोलनातून देण्यात आला होता. मात्र दुपारी विधानसभेत जेव्हा विधेयक सादर
करण्यात आले, त्यात मराठा समाजासाठी एसईबीसी हा नवीन प्रवर्ग तयार करुन त्या
अंतर्गत १६ टक्के आरक्षणाची तरतूद केली गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला
सांगितले. याचे ओबीसी संघर्ष समिती स्वागत करत असल्याचे रामभाऊ पेरकर यांनी ‘सांजवार्ता ऑनलाईन’शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागत
करतो. या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा
समाजाची उन्नती व्हावी या आमच्या शुभेच्छा आहेत. ओबीसी समाजाला धक्का न लावता
दिलेले हे आरक्षण महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासूनची मराठा समाजाची मागणी पूर्ण झाली आहे.












